Team Agrowon
पोल्ट्री, कापड आणि इथेनॉल उद्योगाची वाढती मागणी त्या तुलनेत देशांतर्गत असलेली कमी उत्पादकता या कारणामुळे मक्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
देशातील काही भागात मका प्रतिक्विंटल ३००० रुपयांवर पोहचला असून महाराष्ट्रात देखील मक्याचे व्यवहार २७०० ते २९०० रुपयांनी होत आहेत.
देशात दरवर्षी सुमारे ३५० ते ३८० लाख टन मका उत्पादन होते. तर दुसरीकडे देशांतर्गत मका मागणी ४०० लाख टन आहे. त्यामुळे दरवर्षी थोड्याफार प्रमाणात मक्याचा तुटवडा निर्माण होतो, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.
बिहार सरकारने जैवइंधनाला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे बिहारमध्येच मक्याला मागणी वाढली आहे. बिहार राज्यात १७ ते १८ रुपये किलो दर होता. परंतु मागणी वाढल्याने दर २२ ते २३ रुपये प्रतिकिलोवर पोचले आहेत.
इथेनॉल त्यासोबतच जैव इंधनासाठी मका वापर वाढल्याने त्याचा थेट फटका कुक्कुटपालन व्यवसायाला बसला आहे.
महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये मक्याचे व्यवहार २२०० ते २८०० रुपये क्विंटलने होत आहेत. कुक्कुटपालकांना याची विक्री २७०० ते २९०० रुपये क्विंटलने होत आहे.
तयार पशुखाद्याचे दरही सरासरी २० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे लेअर आणि ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसायिकांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.