Anuradha Vipat
श्रावण सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर मनोभावे मुठभर धान्य अर्पण करणे म्हणजे 'शिवामूठ' वाहणे होय.
नवविवाहित स्त्रिया विवाहानंतर पहिली ५ वर्षे आपल्या पतीच्या व कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी हे व्रत करतात.
श्रावण महिन्यात साधारणपणे ४ किंवा ५ सोमवार येतात. त्यानुसार क्रमाने खालील धान्ये वाहिली जातात पहिला सोमवार: तांदूळ ,दुसरा सोमवार: पांढरे किंवा काळे तीळ,तिसरा सोमवार: अक्खे मूग,चौथा सोमवार: जवस ,पाचवा सोमवार: सातू (जव)
सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. मंदिरात किंवा घरच्या शिवलिंगावर आधी गंगाजल, पाणी किंवा दुधाने अभिषेक करावा. त्यानंतर चंदन, बेलपत्र आणि पांढरी फुले अर्पण करून तुपाचा दिवा लावावा.
उजव्या हातात त्या सोमवारचे ठराविक धान्य एक मूठभर घ्यावे. शिवलिंगावर ती मूठ हळूवारपणे अर्पण करावी. धान्य इकडे-तिकडे खाली सांडणार नाही याची काळजी घ्यावी.
शिवामूठ अर्पण करताना खालील पौराणिक मंत्र ३ वेळा म्हणावा
"शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा,सासू-सासऱ्या, दिरा-भावा, नणंदा-जावा, भ्रतारा (पती) आवडती कर रे देवा!
शिवामूठ वाहणाऱ्या महिला या दिवशी दिवसभर एकभुक्त राहून किंवा फलाहार करून उपवास करतात.