Aslam Abdul Shanedivan
तालुक्यातील कोंढापुरी येथील शासकीय तलावातील पाण्यावर कोंढापुरी, रांजणगाव गणपती, पिंपरी दुमाला, खंडाळे, वरुडे, निमगाव म्हाळुंगी आदी गावांतील शेतकरी व ग्रामपंचायतीच्या पाणी योजना अवलंबून आहेत.
कोंढापुरी येथील तलाव कोरडा ठणठणीत पडल्याने सर्व पाणी योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे शासकीय तलावात चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तलाव कोरडा ठणठणीत पडल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी आमदार अशोक पवार यांची भेट घेतली आहे.
यावर येथील तलावात प्राधान्याने पाणी सोडले जाईल, असे आश्वासन आमदार पवार यांनी दिले आहे.
कोंढापुरी येथील कुंभारखणी तलावातही चासकमानचे पाणी चारीद्वारे सोडावे, अशी आग्रही मागणी माजी सरपंच अशोक गायकवाड, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दिनेश गायकवाड व ग्रामस्थांनी केली आहे.
खंडाळे (ता. शिरूर) येथेही पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून कोंढापुरी तलावात पाणी सोडण्याची मागणी खरेदी- विक्री संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र नरवडे व ग्रामस्थांनी केली आहे.
‘‘मागणी केलेल्या सर्व भागांतील शेतकरी व नागरिकांना चासकमानचे पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती आमदार ॲड.अशोक पवार यांनी दिली आहे.