Team Agrowon
प्रथम कपाशी पिकातील अतिरिक्त पाण्याचा तत्काळ निचरा करण्याकडे लक्ष द्यावे. ओल्या मातीमध्ये केलेल्या उपायांना झाड फारसे प्रतिसाद देत नाही. त्यामुळे लवकरात लवकर जमीन कशी कोरडी होईल, हे पाहावे.
पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराला समांतर चर काढून साचलेले पाणी शेताबाहेर काढावे.
मुळात वरंब्यावर कपाशीची लागवड केलेली असल्यास अधिकचे पाणी सरी मधून निघून जाईल.
शेतात खोदलेले चर मोकळे करावेत त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होईल.
सखल भागातील पाण्याला वाट करून द्यावी. शक्य असेल तर साचलेले पाणी बाहेर उपसून बाहेर काढावे. वाफसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.
झाडावर (१ टक्का) या प्रमाणात १९:१९:१९ किंवा डाय अमोनिअम फॉस्फेट (१ टक्का) म्हणजे १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे सात दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. पिकांच्या पोषणास मदत होते.
कपाशीची झाडे शेंडा खुडण्याच्या अवस्थेत असल्यास शेंडा खुडण्याचे काम ७ दिवसांनी लांबवावे. कारण पाणी साचल्यामुळे कपाशीची वाढ मंद झालेली असते. त्यात शेंडा खुडल्यास त्यानंतर अपेक्षित असलेली फळ फांद्यांची वाढ मिळणार नाही.
या हंगामात अति पावसामुळे गंभीर परिस्थिती असली तरी अन्य पिकांच्या तुलनेने कापूस एक लवचिक व काटक वनस्पती आहे. शेतकरी कपाशी झाडाच्या वाढीसाठी अनावश्यक संप्रेरकाच्या फवारणीची घाई करतात. हे टाळावे.