Team Agrowon
पूर्वी स्पिलोसामा वर्गातील केसाळ अळीचा प्रादुर्भाव होत असला, तरी या किडीचं प्रमाण जास्त नव्हतं. पण गेल्या काही वर्षांमध्ये सोयाबीन पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय.
केसाळ अळीचा प्रादुर्भाव वाढण्यामध्ये ढगाळ वातावरण, पावसाची अनियमितता आणि पेरणीची बदललेली वेळ अशी काही कारणे आहेत.
पूर्ण वाढलेल्या अळ्याच्या अंगावर भरपूर केस असतात. या अळ्या पानाचा हिरवा भाग खातात. त्यामुळे पाने वाळतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पान जाळीदार होऊन फक्त शिरा शिल्लक राहतात.
अळीच्या नियंत्रणासाठी पूर्वी सूर्यफूल पीक घेतलेल्या शेतामध्ये सोयाबीन पीक घेणं शक्यतो टाळावं. कारण ही अळी सुर्यफुलावरची प्रमुख कीड म्हणून ओळखली जाते.
शेताच्या कडेनी सोयाबीन पेरणी वेळी सापळा पीक म्हणून सूर्यफुलाची पेरणी करावी. शेतीचे बांध स्वच्छ ठेऊन बांधावर असणाऱ्या किडीच्या पूरक वनस्पती उपटून टाकाव्यात.
जास्त प्रादुर्भाव असलेल्या भागात प्रकाश सापळे लावून या किडीचे पतंग नष्ट करावेत. याशिवाय शेतात हेक्टरी १५ ते २० पक्षिथांबे लावूनही या किडीच नियंत्रण व्हायला मदत होते.
केसाळ अळीच्या वाढीसाठी उष्ण तापमान, जास्त आर्द्रता, जास्त पाऊस आणि त्यानंतर कोरडx वातावरण पोषक आहे. असं वातावरण असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन पिकाचं नियमित निरीक्षण आणि सर्वेक्षण करून अळीचा प्रादुर्भाव ओळखावा.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाच टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरॅक्टिन १००० पीपीएम २ ते ३ मिलि एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.