Team Agrowon
काही अाजारांची लहानसहान लक्षणे असतात. दुर्लक्ष न करता ती वेळीच अोळखावी लागतात. साधारणपणे लहान मुलांनाच जंताचा त्रास होतो, असा समज असतो. पण मोठ्यांमध्येही हा त्रास असू शकतो.
लहानपणी कधी पोट दुखले, भूक कमी झाली किंवा वजन कमी झाले तर जंत झाले असतील असे प्राथमिक निदान केले जात असे. त्यात तथ्य होते.
सामान्यतः सहज अाणि वैकारिक असे दोन प्रकारचे कृमी असतात. त्यापैकी जे शरीराच्या स्वास्थ्यासाठी मदत करतात त्यांना सहज कृमी म्हणतात. ज्यांच्यामुळे विविध आजार निर्माण होतात त्यांना वैकारिक कृमी म्हणतात.
फार गोड पदार्थ खाणे हे महत्त्वाचे कारण ठरते. गुळापासून बनवलेले पदार्थ अति प्रमाणात खाणे, शिळे पदार्थ, आंबट ताक, मांसाहार (विशेषतः मासे), माती खाण्याची सवय, दुपारी भरपूर झोपणे, व्यायाम न करणे या विविध कारणांनी जंत निर्माण होतात.
किडलेल्या न निवडलेल्या, न स्वच्छ केलेल्या पालेभाज्या हे सुद्धा कृमींचे महत्त्वाचे कारण आहे. त्यासाठी पावसाळ्यात पालेभाज्या खाताना विशेष काळजी घ्यावी.
प्रत्येकातील लक्षणे भिन्न असतात. तापाची कणकण, मळमळणे, भूक कमी होणे, वजन कमी होणे, पोट बिघडणे, शाैचाच्या ठिकाणी (गुद्पाशी) खाज येणे, त्वचेवर पांढरे डाग पडणे, त्वचा निस्तेज बनणे अशी सामान्य लक्षणे कृमींची असतात.
आयुर्वेदानुसार कफप्रधान, रक्तप्रधान, मलज असे पोटप्रकार असतात. त्यापैकी दूध, मासे, गूळ यामुळे कफज कृमी निर्माण होतात. ज्यामुळे तोंडाला पाणी सुटणे, उलटी, तोंडाला चव नसणे अशी लक्षणे निर्माण होतात.
लहान मुलांत माती खाणे कारणीभूत ठरते. त्यामुळे शाैचाच्या ठिकाणी खाज, खा-खा होणे, वजन कमी होणे, तोंडावर डाग येणे अशी लक्षणे दिसून येतात. रक्तज कृमी त्वचेवर खाज निर्माण करतात.
काहींमध्ये पापण्या, भुवयांचे केसही गळू पडतात. पुरीषज कृमीमुळे ढेकर येणे, पोटदुखी, जुलाब, भूक कमी होणे या लक्षणांनी रुग्ण बेजार होतो. या सर्वांसाठी वेळेवर चिकित्सा करून घेणे आवश्यक असते.