Team Agrowon
यंदाच्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षाचे नुकसान झाले असल्याने बेदाण्याचे उत्पादन कमी झाले आहे.
परंतु बेदाणा निर्मितीस पोषक वातावरण असल्याने दर्जेदार बेदाणा तयार झाला आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात बेदाण्याचे दर प्रति किलोस २० ते ३० रुपयांनी अधिक आहेत.
राज्यात गेल्या चार महिन्यांत सुमारे ९५ हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे. प्रतवारीनुसार बेदाण्याला प्रति किलोस ११० ते २२० रुपये असा दर मिळत असून बेदाण्याचे दर टिकून आहेत.
येत्या काळात बेदाण्याच्या दरात फारसे चढ-उतार होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
राज्यात या वर्षी २ लाख १५ हजार टन इतके बेदाण्याचे उत्पादन झाले आहे. मुळात द्राक्ष हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षाचे नुकसान झाल्याने बेदाण्याचे उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ५७ हजार टनांनी घटले आहे.
गेल्या फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत बेदाण्याच्या दरात चढ-उतार झाले नाही. होळी सणाची खरेदी झाल्यानंतर बेदाण्याच्या दरात घसरण झाली होती. परंतु त्यानंतर बाजारात बेदाण्याची मागणी वाढली. त्यामुळे पुन्हा बेदाण्याचे दर वाढले.
हंगाम सुरू झाल्यानंतर बेदाण्याच्या दरात फारशी तेजी मंदी आली नाही. सध्या बाजारात बेदाण्याची मागणी चांगली असून उठावही चांगला होत आहे. त्यामुळे बेदाण्याचे दर टिकून आहेत.