Team Agrowon
पाझर तलाव म्हणजे नैसर्गिक नाला अथवा ओढ्यावर आडवा बांधलेला आणि पाणलोटक्षेत्रातून गोळा होणारा प्रवाह अडवून तो जास्तीत जास्त दिवस साठवून, तो जमिनीत मुरवून त्या क्षेत्रातून भूजलाची पातळी वेगाने वाढविणाऱ्या बंधाऱ्यामुळे तयार होणारा जलाशय.
पाणलोटक्षेत्रात वाहून जाणारे पाणी अडविले जाऊन शेतीकरिता व त्या क्षेत्रातील भूजल पुनर्भरणाकरिता त्याचा वापर होऊ शकतो.
पाझर तलावामुळे पाण्याबरोबर वाहून जाणारी सुपीक मातीदेखील अडविली जाते. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी दुष्काळी प्रदेशात पाझर तलावाचे बांधकाम करतात.
पाझर तलावाचे बांधकाम करताना अशा पद्धतीने करावे की, पावसाळ्यात तलाव संपूर्ण भरावा आणि हिवाळ्यापर्यंत सर्व पाणी पाझरून/ मुरून आजूबाजूच्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. ज्या ठिकाणी पाझर तलावाचे बांधकाम असते, त्या ठिकाणी जमिनीचा थर पाझरास योग्य असावा लागतो.
पाझर तलावाचे मुख्य कार्य म्हणजे त्यामध्ये साठविलेले पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविणे. पाझर तलाव हा सच्छिद्र भूभागावर बांधला, तरच त्याचे फायदे मिळू शकतात.
पाझर तलाव अशा ठिकाणी बांधावा, की तेथील जमिनीचा वरचा थर सच्छिद्र असेल आणि त्याखालच्या कमीत कमी तीन मीटर जाडीचा थर हा जास्तीत जास्त झिजलेला असेल. अशा प्रकारच्या जमिनीवर बांधलेल्या तलावामुळे भूजल पुनर्भरणाचा वेग वाढतो.
पाझर तलावाच्या खालच्या बाजूला अथवा परिणाम क्षेत्रात पिकायोग्य जमीन मोठ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे. अशी मोठ्या प्रमाणातील शेतजमीन असल्याने पाझर तलावाचा जास्तीत जास्त उपयोग करून शक्य होते.
Ghee Health Benefits : तूप खाऊन येईल रूप ; तूप खाण्याचे आरोग्यदायी फायदे