Team Agrowon
श्रावणामुळे गुजरात येथून मागणी वाढल्याने बिगर हंगामी गुळाच्या दरात क्विंटलला तब्बल ४०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
सध्या कोल्हापूर बाजार समितीत येणाऱ्या गुळास क्विंटलला किमान ३७०० ते कमाल ४६०० रुपयापर्यंत दर मिळत आहे.
कोल्हापूर बाजार समितीत एक ते दोन दिवसाला सहा ते सात हजार गूळ रव्यांची आवक होत आहे. गेल्या सप्ताहापासून ही दरवाढ झाल्याने गूळ उत्पादकांत समाधान आहे.
श्रावण महिन्यामुळे गुजरातमधून अचानक वाढलेली गुळाची मागणी आणि तेथील शीतगृहामध्ये गूळ शिल्लक नसल्याने व्यापाऱ्यांनी गुळाची खरेदी वाढवली.
सातत्यपूर्ण मागणी असल्याने पुढील एक महिना तरी गुळाचे भाव चांगले राहतील, अशी अपेक्षा आहे.
पावसामुळे कोल्हापुरातून येणारा गूळ कमी असल्याने यंदा प्रथमच गुजरातमध्ये गुळाची काहीशी चणचण भासली.
त्यामुळे गुजरात मधील व्यापाऱ्यांनी चढ्या दराने कोल्हापुरातील गुळाची खरेदी केली.
यंदा कर्नाटकपेक्षा कोल्हापुरी गुळाला जास्त मागणी असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. कोल्हापूर ब्रँड नेमणे हा गूळ जात असल्याने येणाऱ्या काळात कोल्हापुरातील गुराळ घरांना चांगली संधी आहे.