Team Agrowon
शेतीसाठी जमीन आहे. मात्र पाणी नाही. अशी स्थिती राज्याच्या अनेक भागात पाहायला मिळते. तर पाणी नसल्याने अनेक जमिनी कोरड्या पडल्या आहेत.
आता मात्र नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प अंतर्गत विहीर पुनर्भरण (पोकराअंतर्गत) योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी आहे.
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामानबदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य असून सिंचनाची सोय निर्माण करणे व पीक उत्पादनात वाढ करणे हा योजनेचा हेतू आहे.
अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना तसेच अनुसूचित जमाती/ जाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येणार आहे. यासाठी जमिनीचे क्षेत्र हे ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित शेती सिंचनाची सोय नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. मात्र ज्यांनी याचा लाभ घेतला आहे. त्यांना पुन्हा लाभ मिळत नाही.
महाराष्ट्र भूजल अधिनियम अधिनियम २००९ नुसार पिण्याच्या पाण्याच्या श्रोताव्यतिरिक्त प्रास्ताविक विहीर व अस्तित्वात असलेल्या इतर विहिरीचे अंतर १५० मीटरपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. नवीन विहीर खोदणे व अन्य बाबींची पूर्तता या कामांसाठी कमाल १ वर्षाचा कालावधी अनुज्ञेय आहे.
मार्गदर्शक सूचनेसह अर्ज कसा व कोठे करावा यासाठी पात्र आणि इच्छुक शेतकऱ्यांनी https://dbt.mahapocra.gov.in या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.