Anuradha Vipat
नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गेचे सर्वात भयंकर पण अत्यंत शुभ मानले गेलेले रूप म्हणजे 'माता कालरात्री'.
देवीचे हे रूप दिसायला अत्यंत उग्र आणि भयानक असले, तरी ते भक्तांसाठी नेहमी कल्याणकारी आणि शुभ फळ देणारे असते, म्हणूनच माता कालरात्रीला 'शुभंकरी' असेही म्हटले जाते.
माता कालरात्रीचा रंग घनदाट अंधारासारखा म्हणजेच काळा कुळकुळीत आहे. तिचे केस विखुरलेले असून गळ्यात विजेसारखी चमकणारी पांढरी माळ आहे.
देवीला तीन डोळे असून ते ब्रह्मांडासारखे गोल आणि चमकणारे आहेत. तिच्या श्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाळा निघत असतात. देवीचे वाहन गाढव आहे.
देवीला चार हात असून, एका हातात खडग , दुसऱ्या हातात लोखंडी काटेरी अस्त्र, तिसरा हात अभयमुद्रेत आणि चौथा हात वरमुद्रेत आहे.
पौराणिक कथेनुसार, जेव्हा शुंभ, निशुंभ आणि रक्तबीज या राक्षसांनी तिन्ही लोकांत हाहाकार माजवला होता, तेव्हा देवराज इंद्राच्या प्रार्थनेवरून देवी पार्वतीने दुर्गा रूप धारण केले.
रक्तबीजाचा सर्वनाश करण्यासाठी देवीने आपले अत्यंत उग्र रूप प्रकट केले, ज्याला 'कालरात्री' किंवा 'महाकाली' म्हटले गेले.