Team Agrowon
मातीमध्ये असलेल्या विविध सूक्ष्म जिवांच्या (यात उपयुक्त जिवाणू, बुरशी इ. सर्व आले.) साह्याने वनस्पती आपली वाढ करून घेत असते. गेल्या काही वर्षांमध्ये या प्रमुख घटकाकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.
या सूक्ष्मजीवांची जाणीव ठेवून त्यांना पूरक अशा पद्धतीने शेती करणे म्हणजेच नैसर्गिक शेती होय. यात बाहेरून काही टाकण्याऐवजी प्रामुख्याने नैसर्गिकरीत्या मातीमध्ये वाढणाऱ्या सूक्ष्म जिवाच्या साह्याने केली जाते.
या पद्धतीमध्ये जमीन सजीव असल्याचे समजून सर्व व्यवस्थापन केले जाते. परिणामी, जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढते.
सूक्ष्मजीव आणि गांडुळे हे अनादी काळापासून एकमेकांचे साथीदार आहेत. एकाची संख्या वाढली, की दुसऱ्याचीही संख्या आपोआप वाढते. हे दोघे भरपूर प्रमाणात उपलब्ध असले की जमिनीचे आरोग्य सुधारते.
रासायनिक घटकांच्या अवाजवी वापर आणि सातत्याने घेतल्या जाणाऱ्या पिकांमुळे आपल्या नैसर्गिक संसाधनांचे अत्याधिक शोषण होत आहे. पिकाच्या उत्पादन खर्चात वाढ होत चालली असून, त्या तुलनेमध्ये उत्पादन वाढताना दिसत नाही.
ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणातील संभाव्य बदल हे चिंतेचे विषय बनले आहेत. जमीन, प्राणी, पक्षी, वनस्पती आणि मानवाचे स्वास्थ यावरील परिणामाबाबत शेतकऱ्यांमध्ये हळूहळू जागरूकता वाढत आहे.
रासायनिक शेतीला पर्याय म्हणून सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत आहे. मात्र गोधन कमी झाल्यामुळे सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक तितक्या सेंद्रिय खतांचा पुरवठा होत नाही.