sandeep Shirguppe
सांगली जिल्ह्यातील समडोळी (ता. मिरज) येथे राहुल जाधव यांची ४ एकर शेती आहे. त्यात मुख्य पीक म्हणून ऊस लागवड केली जाते.
राहुल यांनी कृषी पदविकेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना सुरुवातीपासून फुलशेतीची आवड होती. त्यामुळे त्यांनी झेंडू लागवड करण्याचा निर्णय घेतला.
मागील नऊ वर्षांपासून ते झेंडू लागवड करत आहेत. घरच्या संपूर्ण शेतीमध्ये ऊस लागवड असल्याने करार पद्धतीने जमीन घेऊन त्यात झेंडू लागवड करण्यास त्यांनी सुरुवात केली.
कृषीमध्ये घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग ऊस आणि फूल शेती राहुल करत आहेत. बारमाही झेंडू उत्पादन घेतले जाते.
काटेकोर नियोजन करून दर्जेदार फुलांचे उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दर्जेदार उत्पादनासाठी रोपवाटिकेतून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण तयार रोपांची खरेदी केली जाते.
झेंडू लागवडीसाठी रोपवाटिकेतून रोपांची खरेदी केली जाते. त्यासाठी रोपांची आगाऊ मागणी नोंदवली जाते. लागवडीसाठी कलकत्ता या जातीची झेंडू रोपे मागणीनुसार तयार करून घेतली जातात.
फुलांच्या दर्जेदार उत्पादनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो. त्यासाठी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रत्येक टप्प्यावर खतांच्या योग्य मात्रा दिल्या जातात.
हवामान बदलानुसार पिकावर नागअळी, करपा इत्यादी कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दर ८ दिवसांनी रासायनिक फवारण्या घेतल्या जातात.
सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. लागवड केल्यानंतर एक दिवसाआड प्रमाणे एक तास ठिबकद्वारे पाणी दिले जाते.
लागवडीनंतर साधारण ४५ दिवसांनी फुले तोडणीस येतात. मागील महिन्यात ३१ऑक्टोबरला पहिला तोडा घेतला. त्यातून साधारण ५०० किलो फुलांचे उत्पादन मिळाले.