Team Agrowon
लालपरी कुठे आहे, कधीपर्यंत स्थानकावर येईल, या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. त्यावर आता राज्य परिवहन महामंडळाने उपाय शोधला असून, त्याची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
वर्धा विभागातील २११ बसगाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यात आली आहे. यामुळे एसटीचे थेट लोकेशन आता घरबसल्याच कळणार आहे.
अॅपद्वारे कोणती एस.टी. बस किती वाजता पोहोचणार, कोणती बस अचानक रद्द झाली, या प्रश्नांची उत्तरे आता सहज मिळणार आहेत.
एस.टी.ची तासन्तास करावी लागणारी प्रतीक्षा इतिहासजमा होऊ शकते. त्यासाठी अँड्रॉईड मोबाइलमधील ‘प्ले स्टोअर’मधून महामंडळाचे ‘एमएसआरटीसी अॅप’ डाऊनलोड करावे लागणार आहे.
अॅपद्वारे एसटीची वाट बघणे, एस.टी. रद्द होणे, बिघाड होऊन बंद पडणे, आकस्मिक खोळंबा आदी बाबी प्रवाशांना कळणार आहेत.
एस.टी. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला किंवा काही अडचणींमुळे वेळेनुसार बसस्थानकावर पोहोचायला विलंब होत असल्यास त्याची माहितीदेखील अॅपद्वारे समजणार आहे.
महामंडळाच्या ताफ्यातील २११ बसगाड्यांना जीपीएस सिस्टीम बसवली असून प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
अनधिकृतपणे बस कुठे थांबविली जाते का किंवा ज्या ठिकाणी थांबा आहे तेथे नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ बस थांबविली जातेय का, याचीदेखील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजेल.