Anuradha Vipat
घरी उरलेल्या भातापासून मऊ आणि लुसलुशीत अप्पे बनवणे अतिशय सोपे आहे. हा एक उत्तम, चवदार आणि झटपट होणारा नाश्त्याचा पर्याय आहे.
उरलेला भात,रवा ,दही,चिरलेला कांदा, किसलेले गाजर, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जिरे, चवीनुसार मीठ, अप्पे फुगण्यासाठी इनो किंवा खाण्याचा सोडा, तेल.
मिक्सरच्या भांड्यात उरलेला भात, रवा, दही आणि थोडे पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घ्या. हे मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढा. रवा छान फुगण्यासाठी हे पीठ झाकून १० मिनिटे बाजूला ठेवा.
१० मिनिटांनंतर पिठात चिरलेला कांदा, गाजर, हिरवी मिरची, जिरे, मीठ आणि कोथिंबीर घालून सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करा.अप्पे बनवण्याच्या अगदी आधी पिठात इनो किंवा खाण्याचा सोडा घाला. अप्पे पात्राला गॅसवर मध्यम आचेवर गरम करायला ठेवा आणि सर्व कप्प्यांमध्ये थोडे थोडे तेल सोडा.
चमच्याने तयार पीठ अप्पे पात्राच्या कप्प्यांमध्ये भरा. कढईवर झाकण ठेवून मंद ते मध्यम आचेवर ३ ते ४ मिनिटे खालची बाजू सोनेरी होईपर्यंत भाजू द्या.
झाकण काढून अप्पे चमच्याच्या साहाय्याने उलटे करा. दुसऱ्या बाजूनेही थोडे तेल सोडून झाकण न ठेवता २ मिनिटे छान कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
तुमचे उरलेल्या भाताचे मऊ लुसलुशीत अप्पे तयार आहेत! हे अप्पे तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करू शकता.