sandeep Shirguppe
कडाक्याच्या उन्हात दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा देशभरातून आलेल्या लाखो भाविकांच्या उत्साहात पार पडत आहे.
जोतिबाच्या नावाने चांगभलंचा अखंड गजर करत चैत्र यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठया जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या.
चांगभलंच्या गजराने अवघा जोतिबाचा डोंगर दुमदुमूत आहे तर डोंगर वाटा भाविकांच्या गर्दीने फुलल्या आहेत.
कर्नाटकातून येणारे अनेक भाविक बैलगाडी, खाजगी वाहनातून पायी चालत भाविक जोतिबा डोंगरावर येत असतात.
जोतिबा मंदिरात पहाटे तीन पासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ झाला. पाच वाजता शासकीय महाभिषेक झाला.
दहा वाजता धुपारती सोहळा तर दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे हस्ते मानाच्या पहिल्या सासनकाठीच्या पुजनाने मिरवणुकीस प्रारंभ झाला.
गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण, प्रचंड उंचीच्या फुला माळांनी सजवलेल्या शासन काठ्या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते.
भर उन्हात तरुण वर्ग, गुलालात चिंब होऊन नाचत होता. मुखात जोतिबाच्या नावानं चांगभलचा अखंड गजर करत भाविक सासनकाठ्या नाचवण्यात मग्न झाले.
मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान पाडळी (जि.सातारा) या सासनकाठीचा, त्यानंतर मौजे विहे (ता.पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती.
कसबा डिग्रज (ता.मिरज), कसबा सांगाव (ता.कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली) यांच्या मानाच्या एकूण १०८ सासनकाठ्या सहभागी झाल्या.
हस्तनक्षत्रावर सायंकाळी पावणे सहा वाजता श्री. जोतिबाचा पालखी सोहळा निघाणार आहे, यावेळी तोफेच्या सलामीने जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होते.
सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी व जमदग्नी यांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होतो. हे सर्व फोटो सकाळचे छायाचित्रकार बी. डी. चेचर यांनी टिपले आहेत.