Anuradha Vipat
कृष्ण जन्माष्टमीला बाळकृष्णाच्या जन्मोत्सवानंतर त्याला सुंठवड्याचा नैवेद्य दाखवण्याची जुनी पारंपारिक पद्धत आहे.
सुंठवडा हा केवळ एक मुख्य प्रसाद नाही, तर पावसाळ्याच्या दिवसांत आरोग्यासाठी अत्यंत पाचक आणि पौष्टिक असा सुकामेवा व मसाल्यांचा अनोखा संगम आहे.
सुंठ पावडर ,किसलेले सुके खोबरे,खारीक ,खडीसाखर किंवा गुळ,काजू व बदाम ,धने किंवा धने पूड,खसखस,ओवा,बडीशेप,तीळ,वेलची पावडर,मनुका,तूप,तुळशीचे पान.
किसलेले सुके खोबरे मंद आचेवर हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. थोडे तूप घालून खारीक, काजू आणि बदाम काही सेकंद परतून घ्या त्यानंतर ओवा, बडीशेप, धने, खसखस आणि तीळ वेगवेगळे मंद आचेवर सुगंध येईपर्यंत कोरडेच भाजून घ्या.
प्रथम मिक्सरच्या भांड्यात खडीसाखर, खारीक, काजू आणि बदाम घालून थोडे जाडसर वाटून घ्या. त्यानंतर त्यात भाजलेला ओवा, बडीशेप, धने, खसखस आणि तीळ घालून पुन्हा एकदा मिक्सर चालू-बंद करत फिरवून घ्या.
आता हे तयार मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढा. त्यात भाजलेले खोबरे, सुंठ पावडर, वेलची पावडर आणि मनुके घाला. सर्व घटक हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्या.
तुमचा मऊ आणि सुवासिक 'सुंठवडा प्रसाद' तयार आहे. यावर तुळशीचे पान ठेवून मध्यरात्री १२ वाजता बाळकृष्णाला नैवेद्य दाखवा!