Team Agrowon
धनुर्वात (टिटॅनस) हा जनावरे आणि मानवाच्या मज्जातंतूंना जडणारा विषजन्य आणि जीवघेणा आजार आहे. हा आजार टेटॅनस टॉक्सीन विषामुळे होतो.
क्लोस्ट्रिडियम टिटॅनी हे जिवाणू माती तसेच बहुतांश प्राण्यांच्या आतड्यांमध्ये असतात. माती, धूळ आणि गंजलेल्या टोकदार वस्तूंवर जिवाणू किंवा त्यांचे बीजाणू मोठ्या संख्येने दिसून येतात.
जिवाणू संसर्ग झाल्यानंतर आजार होण्याचा कालावधी तीन ते एकवीस दिवसांच्या दरम्यान असू शकतो.
जिवाणूंचा उबवण काळ साधारणपणे दोन दिवस ते दोन आठवडे असतो; परंतु काही वेळा हा काळ तीन महिन्यांचा असू शकतो. हा काळ जेवढा अधिक तेवढा आजार सौम्य असतो.
शरीरात जिवाणूंनी प्रवेश केल्यानंतर ३ ते १४ दिवसांत आजाराची लक्षणे दिसू लागतात.
जिवाणू स्नायूंमध्ये वाढत असताना टेटॅनोस्पाझ्मीन हे घातक विष उत्सर्जित करतात. विषाच्या प्रमाणानुसार आणि बाधित जनावराच्या प्रतिकार क्षमतेनुसार आजाराची तीव्रता ठरते.
ज्या ठिकाणी हे जिवाणू शरीरात प्रवेश करतात आणि वाढतात, त्या ठिकाणापासून विष रक्तप्रवाहात मिसळून चेतापेशींपर्यंत पोहोचून चेतापेशींना इजा करते.