Team Agrowon
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये ट्रेचा वापर आवश्यक आहे. चारानिर्मितीसाठी चांगल्या प्रतीचे मका बियाणे निवडावे. बियाण्याची उगवणक्षमता चांगली असावी.
दोन लिटर कोमट पाण्यात एक किलो मका दिवसभर भिजत ठेवावा. त्यानंतर भिजविलेल्या मक्यातून पाणी निथळून गेल्यानंतर बियाणे ओल्या गोणपाटात गुंडाळून ठेवावे. यामुळे बियाणांची उगवण चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते.
गोणपाटावर सकाळ, संध्याकाळी पाणी शिंपडून सतत ओलसर ठेवावे. अशा पद्धतीने मका बियाणास सुमारे दोन दिवसांनंतर मोड फुटतात.
मोड आलेले बियाणे ट्रे मध्ये पसरावे. ट्रे चा आकार तीन फूट लांब, दोन फूट रुंद आणि तीन इंच उंच असावा.
प्रत्येक ट्रे साठी एक किलो मका लागतो. आपल्याकडील जनावराच्या संख्येनुसार ट्रे ची संख्या ठरवावी. लाकडी पट्या किंवा बांबूच्या फ्रेमवर ट्रे ठेवावेत.
ट्रे वर दिवसातून ४ ते ५ वेळेस झारीने पाणी फवारावे. एका ट्रे ला दोन लिटर पेक्षा जास्त पाणी लागत नाही. पंधरा दिवसांत चारा तयार होईपर्यंत प्रति ट्रे साठी तीस लिटर पाण्याची गरज असते.
सुमारे १२ ते १५ दिवसांमध्ये मका चारा साधारणपणे एक फुटांपर्यंत वाढतो. एक किलो बियाण्यापासून सुमारे १० ते १२ किलो चारा तयार होतो. हा चारा दुभती जनावरास प्रती दिन १०-१२ किलो आणि भाकड जनावरे ६-८ किलो द्यावे.