Anuradha Vipat
हिवाळ्यात वापरले जाणारे महागडे स्वेटर, शाली आणि लोकरीचे जॅकेट्स सामान्य कपड्यांप्रमाणे धुतल्यास ते आकुंचन पावतात आणि त्यांचा मऊपणा निघून जातो.
लोकरीच्या कपड्यांची चमक वर्षानुवर्षे नव्यासारखी टिकवून ठेवण्यासाठी ते धुण्याच्या, वाळवण्याच्या आणि साठवून ठेवण्याच्या काही खास टिप्स नक्की फॉलो करा.
लोकरीच्या कपड्यांसाठी कधीही कडक साबण किंवा साधी डिटर्जंट पावडर वापरू नका. त्याऐवजी 'वुलन केअर' लिक्विड डिटर्जंट किंवा बेबी शाम्पू थंड पाण्यात मिसळून त्यात १०-१५ मिनिटे कपडे भिजत ठेवा.
गरम पाण्यामुळे लोकरीचे धागे खराब होतात आणि स्वेटर आकुंचन पावतो. कपडे नेहमी थंड पाण्यात हाताने हलक्या दाबाने धुवावेत.
ओले लोकरीचे कपडे हाताने पिळल्यास त्यांचा आकार बिघडतो. त्याऐवजी ते एका जाड सुती टॉवेलवर पसरवून हलक्या हाताने दाबून जास्तीचे पाणी शोषून घ्या.
कपडे स्वच्छ धुतल्यानंतर शेवटी बादलीभर थंड पाण्यात १ चमचा हेअर कंडिशनर किंवा पांढरे व्हिनेगर टाकून त्यात स्वेटर ५ मिनिटे बुडवून काढा.
प्रखर सूर्यप्रकाशामुळे लोकरीच्या कपड्यांचा रंग फिका पडतो. त्यामुळे स्वेटर नेहमी सावलीत किंवा उलटे करून वाळत घालावेत.