Swarali Pawar
कोंबड्यांच्या एकूण खर्चातील ६० ते ७० टक्के खर्च खाद्यावर होतो. वयानुसार संतुलित आहार दिल्यास खर्च कमी करून वाढ आणि अंडी उत्पादन चांगले ठेवता येते.
० ते ८ आठवड्यांच्या पिल्लांना सुमारे २० टक्के प्रथिनांचे खाद्य द्यावे. ९ ते २० आठवड्यांच्या ग्रोवर आणि अंडी देणाऱ्या कोंबड्यांना वेगळे संतुलित खाद्य द्या.
मका, ज्वारी, बाजरी आणि गहू ऊर्जेसाठी, तर सोयाबीन पेंड, भुईमूग पेंड आणि सूर्यफूल पेंड प्रथिनांसाठी वापरा. यासोबत खनिज मिश्रण आणि जीवनसत्त्वे योग्य प्रमाणात देणेही गरजेचे आहे.
अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या खाद्यात सुमारे ३.५ टक्के कॅल्शिअम असणे महत्त्वाचे आहे. चुनखडी पावडर, शिंपल्यांची पूड किंवा योग्य खनिज मिश्रणातून कॅल्शिअम देता येते.
लसूणघास, दशरथ घास, पालेभाज्या आणि टोमॅटोचे बारीक तुकडे २५ ते ३० टक्क्यांपर्यंत खाद्यात मिसळता येतात. अझोला आणि शेवग्याच्या पाल्याचाही योग्य प्रमाणात वापर करून खाद्यखर्च कमी करता येतो.
काळपट, बुरशी लागलेले, दुर्गंधीयुक्त किंवा पावसाने भिजलेले खाद्य कोंबड्यांना देऊ नका. खाद्य नेहमी कोरड्या आणि स्वच्छ ठिकाणी साठवून ठेवा.
खाद्याची भांडी पाऊणपटच भरावीत आणि त्यांची उंची कोंबडीच्या पाठीइतकी ठेवावी. साधारण ४० ते ५० कोंबड्यांसाठी एक खाद्याचे भांडे पुरेसे ठरते.
कोंबड्या खाद्यापेक्षा साधारण दुप्पट पाणी पितात, त्यामुळे स्वच्छ पाणी नेहमी उपलब्ध असू द्या. संतुलित खाद्य, स्वच्छ पाणी आणि योग्य व्यवस्थापनामुळे कोंबड्यांचे आरोग्य व उत्पादन चांगले राहते.