Swarali Pawar
मागील काही दिवसांपासून पाऊस कमी असल्याने भाजीपाला पिकांवर पाण्याचा ताण वाढण्याची शक्यता आहे. टोमॅटो, मिरची, वांगी आणि वेलवर्गीय पिके फुलोरा-फळधारणेत असतील तर विशेष काळजी घ्या.
एकाच वेळी जास्त पाणी देण्याऐवजी ठिबक सिंचनातून कमी प्रमाणात आणि वारंवार पाणी द्या. यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर होऊन जमिनीत आवश्यक ओलावा टिकवता येईल.पि
भाजीपाला पिकांच्या दोन ओळींमध्ये सेंद्रिय आच्छादनाचा वापर करा. यामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन ओलावा जास्त काळ टिकण्यास मदत होते.
पाण्याच्या टंचाईच्या काळात तणांमुळे पिकाशी पाणी आणि अन्नद्रव्यांसाठी जास्त स्पर्धा होते. त्यामुळे भाजीपाला पिकातील तणांचे वेळीच नियंत्रण करून उपलब्ध पाणी पिकासाठी राखून ठेवा.
टोमॅटो, मिरची, वांगी, काकडी, कारले आणि दुधी भोपळ्याला फुलोरा-फळधारणेत पुरेसा ओलावा मिळणे महत्त्वाचे आहे. पाण्याचा ताण आल्यास फुलगळ, फळगळ वाढून उत्पादन आणि गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.
काकडी, कारले आणि दुधी भोपळ्यात फुलगळ दिसत असल्यास जमिनीत वाफसा राहील अशा पद्धतीने सिंचन करा. फुलोऱ्यात एनएए २० पीपीएम आणि बोरॉन २० पीपीएमचा वापर करण्याची शिफारस आहे.
पावसाचा खंड असताना पिकांची नियमित पाहणी करा आणि कीड-रोगाची लक्षणे दिसल्यासच शिफारशीनुसार फवारणी करा. मिरचीतील फुलकिडीसाठी कडुनिंबाची भुकटी, कडुनिंबाचे तेल किंवा कडुनिंब आधारित फॉर्म्युलेशनचा वापर करता येतो.
ठिबक सिंचन, सेंद्रिय आच्छादन, तण नियंत्रण आणि महत्त्वाच्या अवस्थेत योग्य सिंचनाला प्राधान्य द्या. उपलब्ध पाणी जास्त दिवस पुरवल्यास भाजीपाला पिकांवरील पाण्याचा ताण कमी करून उत्पादन टिकवता येईल.