Swarali Pawar
उसाच्या खोडव्यात नवीन लागवडीपेक्षा ३५ ते ४० टक्के कमी खर्च येऊ शकतो. मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीत पाण्याच्या किमान २ ते ३ पाळ्या उपलब्ध असतील, तरच खोडवा ठेवण्याचा निर्णय घ्या.
ऊस तोडल्यानंतर बुडखे धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटावेत. त्यामुळे जमिनीखालील डोळ्यांतून फुटवे येण्यास आणि मुळांद्वारे पाणी व अन्नद्रव्ये शोषण्यास मदत होते.
दुष्काळात बगला फोडल्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊ शकतो आणि उसाची जुनी मुळे तुटू शकतात. त्यामुळे यंदा बगला फोडणे टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
खोडव्यात विरळ उगवण असलेल्या ठिकाणी तोडणीनंतर १५ ते २१ दिवसांत नांग्या भरण्याचे नियोजन करा. त्यासाठी २५ ते ३० दिवसांची निरोगी आणि जोमदार रोपे वापरा.
उसाचे पाचट शेतात पसरवून आच्छादन करा. यामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास, बाष्पीभवन कमी होण्यास आणि जमिनीतील ओलावा टिकवण्यास मदत होते.
पाचट कुजवण्यासाठी हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि २.५ लिटर पाचट कुजवणारे द्रवरूप जिवाणू वापरण्याची शिफारस दिली आहे. पाचट पसरवताना सरी आणि वरंबे मोकळे राहतील याची काळजी घ्या.
ठिबक सिंचनामुळे पाणी थेट मुळांच्या परिसरात देता येते आणि पाण्याचा कार्यक्षम वापर होतो. ठिबकमधून खते दिल्यास योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये मुळांपर्यंत पोहोचवण्यास मदत होते.
खोडव्याची उगवण, फुटव्यांची संख्या आणि जमिनीतील ओलावा नियमित तपासा. पाणी, पाचट व्यवस्थापन आणि योग्य मशागत यांचे नियोजन करून दुष्काळात खोडव्याचे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करा.