Swarali Pawar
शेण, पाचट, काडीकचरा, पालापाचोळा यांसारख्या सेंद्रिय पदार्थांचे कुजवून तयार केलेले नैसर्गिक खत म्हणजे कंपोस्ट खत. हे जमिनीला पुन्हा सुपीक बनवते आणि उत्पादन वाढवते.
कंपोस्ट खतामुळे जमिनीत सेंद्रिय घटक वाढतात. माती पाणी धरून ठेवते आणि नत्राचे प्रमाण १ ते १.५% मिळते. परिणामी पिकांची वाढ आणि उत्पादन सुधारते.
ऊसाचे पाचट, गव्हाचे काड, पिकांची ताटे, पालापाचोळा आणि जनावरांचे शेण वापरावे. कंपोस्ट जिवाणू, युरिया आणि सुपर फॉस्फेटचीही गरज असते.
जमिनीत साधारण ३ फूट खोल व रुंद खड्डा खोदावा. त्यात काडीकचऱ्याचा २० सें.मी. जाडीचा थर द्यावा.
एका ड्रममध्ये पाणी घेऊन प्रत्येक टन काडीकचऱ्यासाठी १०० किलो शेण आणि १ किलो जिवाणू मिसळा. दुसऱ्या ड्रममध्ये ८ किलो युरिया आणि १० किलो सुपर फॉस्फेट टाकून द्रावण तयार करा.
हे द्रावण आणि जिवाणूंचे मिश्रण प्रत्येक थरावर शिंपडा. थरावर थर देत खड्डा पूर्ण भरावा. शेवटी माती किंवा शेणमातीने झाकून घ्यावे.
दीड महिन्यानंतर खड्डा उलथावा म्हणजे कुजण्याची प्रक्रिया जलद होते. जर माती कोरडी वाटली तर थोडे पाणी टाकावे.
सुमारे ४ ते ४.५ महिन्यांत उत्तम कंपोस्ट खत तयार होते. हे खत हलके तपकिरी रंगाचे, आणि पोषक तत्त्वांनी भरलेले असते. असे कंपोस्ट खत वापरल्यास पिकांचे उत्पन्न आणि जमिनीची सुपीकता दोन्ही वाढतात.