Swarali Pawar
नत्र कमी झाल्यावर पानांचा गडद हिरवा रंग फिका होतो आणि जुनी पाने पिवळी पडतात. झाडे बारीक व दुर्बल दिसतात आणि वाढ मंदावते.
स्फुरद कमी पडल्यास पाने आणि खोड गडद हिरवी किंवा जांभळी दिसतात. मुळांची वाढ कमी होते आणि फुले–फळधारणा घटते.
पालाश कमी असेल तर पानांच्या कडा व टोक जळल्यासारखे दिसतात. पिकाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि फळांचे आकार–गुणवत्ता घटते.
कॅल्शियम कमी झाल्यास नवीन पाने विकृत, मरगळलेली दिसतात आणि मुळे नीट वाढत नाहीत. गंधक कमी पडले तर नवीन पाने पिवळी होतात आणि वाढ मंदावते.
लोह कमी झाल्यास नवीन पानांची शिरा हिरवी तर मधला भाग पिवळा दिसतो. मँगनीज कमी पडल्यासही असेच दिसते पण जुनी पाने लवकर वाळतात.
जस्ताची कमतरता असेल तर वरची पाने लहान, आखूड आणि पांढरट दिसतात. मॅग्नेशियम कमी पडल्यास खालची पाने पिवळी–तपकिरी होतात आणि शिरा हिरव्या राहतात.
बोरॉन कमी पडल्यास फुल–फळधारणा कमी होते आणि कोवळी पाने विकृत होतात. तांबे कमी झाल्यास पानांच्या कडा पांढऱ्या होतात. मोलिब्डेनम कमी पडल्यास पाने पोपटी–पिवळी दिसतात आणि नत्र शोषण कमी होते.
माती परीक्षण करून खते द्यावीत आणि सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा. योग्य पाणी व्यवस्थापन करावे आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी. एकाच पिकाची सतत लागवड न करता फेरपालट करावा.