Swarali Pawar
कमी-जास्त पावसामुळे काही भागांत मक्याची वाढ अनियमित दिसत आहे. योग्य वेळी खत आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये दिल्यास पिकाची वाढ सुधारण्यास मदत होते.
पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी रोप अवस्था येते. त्यानंतर तुरा, फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकाला योग्य अन्नद्रव्ये द्या.
जुलैमध्ये लागवड केलेले मका पीक आता साधारण ३० दिवसांचे झाले आहे. अशा पिकाला दुसरा डोस म्हणून एकरी ३५ किलो युरिया द्यावा.
उभ्या मक्याला युरिया देताना तो पिकाच्या बुंध्याला चिकटून देऊ नका. मका पानात पडू देऊ नको. मक्याच्या ओळीपासून १० ते १२ सेंमी अंतरावर खत द्या.
मका साधारण ६० दिवसांचा झाल्यावर फुलोऱ्याच्या अवस्थेत तिसरा खत डोस द्या.
यावेळी पुन्हा एकरी ३५ किलो युरिया देणे फायदेशीर ठरते.
मक्याची वाढ अपेक्षेप्रमाणे होत नसेल तर सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड-२ची फवारणी करा. यासाठी ५ ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्ये प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मक्याची वाढ खुंटली किंवा पीक निस्तेज दिसत असेल तर १९:१९:१९ची २ टक्के फवारणी करा. यामुळे पिकाला आवश्यक अन्नद्रव्ये मिळून वाढ सुधारण्यास मदत होते.
मक्याच्या वाढीची अवस्था पाहून योग्य वेळी खतांचा डोस द्या. गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केल्यास चांगली वाढ आणि उत्पादन मिळण्यास मदत होते.