Team Agrowon
शेताच्या कडेचा किंवा बांधाकडील भाग, विहिरीजवळची जागा तसच बांधावरील मोठ्या झाडांची सतत सावली पडणारा भाग, शेताच्या चारही कोपऱ्यावरील भाग अशा ठिकाणी आपण सहसा पीक घेत नाही. म्हणून अशा ठिकाणचा मातीचा नमुना घेणं टाळाव.
शेतामध्ये पाण्याचा पाट वाहत असणाऱ्या ठिकाणाच्या मातीचा नमुना परीक्षणासाठी घेऊ नये. ही माती सतत ओली राहत असल्यामुळे अशा मातीमधील पोषक अन्नद्रव्ये आणि इतर गुणधर्म शेतामधील इतर ठिकाणच्या मातीपेक्षा वेगळे असतात.
शेतात सेंद्रिय खताचा पुरवठा करण्यासाठी बरेच शेतकरी शेतात जनावरे, शेळ्या-मेंढ्या बसवतात. अशा मातीमध्ये त्या शेतातील इतर ठिकाणच्या मातीपेक्षा पोषक अन्नद्रव्य आणि इतर घटकांच प्रमाण जास्त असत. त्यामुळे शक्यतो शेतात जनावरे बसविण्यापूर्वीच योग्य पद्धतीन मातीचा नमुना घ्यावा.
शेतातील पिकांचे अवशेष जळालेल्या जागेवरील मातीचा नमुना घेऊ नये. याशिवाय शेतात पेरणीपूर्वी शेणखत, कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खत टाकल जात. त्याचे शेतात अनेक ठिकाणी ढीग केले जातात. अशा ठिकाणचा नमुना घेऊ नये.
रासायनिक खते दिल्यावर दोन ते तीन महिन्यांनंतर अशा जागेवरील मातीचा नमुना घ्यावा. कारण खते दिल्यानंतर त्याचे कमी -जास्त अंश शेतामध्ये दोन ते तीन महिन्यापर्यंत राहू शकतात.
पाऊस पडल्यावर किंवा ओलीत केल्यावर मातीमधील काही पोषक अन्नद्रव्यांच प्रमाण बदलून जात आणि त्यांची उपलब्धता बदलते. अशा वेळी ओल्या जमिनीतून शक्यतो मातीचा नमुना घेऊ नये.
शेतात खोल नांगरणी केल्यामुळ मातीच्या थरांची उलथापालथ झालेली असते. अशा जागेवर आपण मातीचा नमुना घेण्यासाठी व्यवस्थितपणे खड्डा खणू शकत नाही त्यामुळ नांगरणी करण्यापूर्वीच माती परीक्षणासाठी मातीचा नमुना घ्यावा.
कोणत्याही हंगामी किंवा फळ पिकांच्या लागवडीच नियोजन करण्यापूर्वी पूर्वीचे पीक काढून झाल्यानंतर मातीचा प्रातिनिधिक नमुना काढून घ्यावा. आि त्यानंतर तो अधिकृत परिक्षण प्रयोगशाळेत पाठवावा.