Swarali Pawar
ओट हे गव्हासारखे दिसणारे, पण थोडे उंच वाढणारे एकदल वर्गीय चारा पीक आहे. याला “सातू” असेही म्हणतात. हे रसाळ, चविष्ट आणि प्रथिनयुक्त चारा देते.
ओटमध्ये ९ ते १० टक्के प्रथिने असतात. हा चारा दिल्यास दुभत्या जनावरांचे दूध आणि स्निग्धांश वाढतो. पाला आणि खोड दोन्ही जनावरांना आवडीचे असतात.
पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडा. हेक्टरी ५ टन शेणखत व १०० किलो बियाणे वापरा. फुले हरिता, फुले सुरभी या जाती उत्तम असून योग्य खत दिल्यास चांगले उत्पादन मिळते.
पहिली कापणी ५० दिवसांनी, दुसरी कापणी ३५ दिवसांनी करावी. जमिनीपासून १० सेंमी उंचीवर कापणी केल्यास पुन्हा वाढ होते. दोन कापण्यांतून ५०० ते ६०० क्विंटल हिरवा चारा मिळतो.
बरसीम हे मेथीसारखे पण अधिक उंच व लुसलुशीत चारा पीक आहे. थंड आणि उबदार हवामानात हे पीक उत्तम वाढते. क्षारयुक्त जमिनीतही हे चांगले येते.
बरसीममध्ये १७ ते १९ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते. जनावरे हा चारा आवडीने खातात. थंडीचा कालावधी जास्त असेल तर अधिक कापण्या मिळतात.
हेक्टरी ३० किलो बियाणे व ५ टन शेणखत वापरा. वरदान आणि मेस्कावी या जाती उत्तम आहेत. हेक्टरी २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्या.
पहिली कापणी ४५ दिवसांनी, त्यानंतर २१ ते २५ दिवसांनी करा. कापणीपूर्वी ४ दिवस पाणी दिल्यास चारा रसाळ होतो. ३ ते ४ कापण्यांतून ६०० ते ८०० क्विंटल हिरवा चारा मिळतो.