Swarali Pawar
मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन हरभऱ्यासाठी योग्य आहे. क्षारयुक्त, पाणथळ किंवा फार हलकी जमीन टाळावी. थंड, कोरडे हवामान आणि १५ ते २५°C तापमान पिकासाठी चांगले असते.
उशिरा पेरणीसाठी विजय, दिग्विजय, फुले विक्रम, फुले विश्वराज (देशी) आणि काबुलीमध्ये विराट, PKV-2, कृपा हे वाण चांगले आहेत. उशिरा पेरणी १५ डिसेंबरच्या आत पूर्ण करावी.
हरभरा लागवडीसाठी ६० ते १०० किलो बियाणे त्याच्या आकारानुसार लागतात. तसेच दोन ओळींत ३० सेमी आणि दोन झाडात १० सेमी अंतर ठेवावे.
सरीवरंबा पद्धतीने पेरणी केल्यास पाण्याचा निचरा चांगला होतो. यामुळे मुळकुज व पाणथळपणाचा त्रास कमी दिसतो.
बीजोत्पादनासाठीचे बियाणे नेहमी प्रमाणित विक्रेत्याकडूनच घ्यावे आणि पिशवीवरील टॅग व तारीख तपासावी. थायरम/बाविस्टीन + रायझोबियम व PSB जिवाणू संवर्धक बीजप्रक्रिया करून पेरावे.
बीजोत्पादनासाठी प्रति हेक्टर २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश द्यावे. हरभऱ्याला साधारण २–३ पाण्याच्या पाळ्या पुरेशा असून फुलोरा आणि घाटे भरण्याच्या वेळी पाणी आवश्यक असते.
पायाभूत बियाण्यासाठी इतर हरभरा जातींपासून १० मीटर आणि प्रमाणित बियाण्यासाठी ५ मीटर विलगीकरण अंतर ठेवावे. गुणधर्म न जुळणारी व रोगट झाडे मुळासकट उपटून काढावी.
पाने व घाटे वाळल्यावर काढणी करावी. बियाण्यातील ओलावा ९% पर्यंत कमी करून स्वच्छ पोत्यात साठवावा.