Swarali Pawar
तूर पिकावर दोन किडी सर्वाधिक धोका देतात. पहिली आहे शेंगा पोखरणारी हिरवी अळी (घाटे अळी) आणि दुसरी शेंगमाशी. या दोन्ही किडी शेंगा आणि दाण्यांना थेट हानी करतात.
अळ्या सुरुवातीला पाने आणि देठ कुरतडतात. वाढल्यानंतर शेंगांना छिद्रे पाडून आत शिरतात आणि दाणे खातात. ढगाळ व थंड वातावरणात प्रादुर्भाव जलद वाढतो.
प्रारंभी शेंगावर लक्षण दिसत नाहीत. अळी दाणे कुरतडून खाल्यानंतर शेंगा आतून खराब होतात, कुजतात आणि बियाणे म्हणून उपयोगी राहत नाहीत.
वेळेवर कोळपणी–खुरपणी करावी. मोठ्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात. हेक्टरी १० कामगंध सापळे आणि २० पक्षीथांबे लावल्यास किडी लक्षणीय कमी होतात.
निंबोळी अर्क ५% फवारणी केल्यास प्रादुर्भाव कमी होतो. घाटे अळीवर एचएएनपीव्ही (१ मिली / १ लिटर पाणी) फवारणी अतिशय प्रभावी व सुरक्षित जैविक उपाय आहे.
आर्थिक नुकसान पातळी गाठल्यावरच रासायनिक फवारणी करावी. अझाडीरॅक्टीन, इमामेक्टिन बेन्झोएट, क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल, फ्ल्युबेन्डायअमाइड, स्पिनोसॅड इत्यादी औषधांचा लेबलक्लेमप्रमाणे वापर करावा.
किड नियंत्रणासाठी कळी अवस्था ५०% फुलोरा, त्यानंतर १५ दिवसांनी अशा तीन वेळेस फवारणी केल्यास शेंगा आणि दाण्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येते.
वेळेवर सर्वेक्षण आणि योग्य फवारणी केल्यास घाटे अळी व शेंगमाशीचा प्रादुर्भाव नियंत्रणात येतो आणि भरघोस उत्पादन मिळते.