Swarali Pawar
अनेक शेतकरी पहिल्या पावसानंतर पेरणी करतात. पण चांगली उगवण हवी असेल तर पाऊस नव्हे, तर जमिनीतला पेरणीयोग्य ओलावा महत्त्वाचा असतो.
बियाणे उगवण्यासाठी आणि रोपांची सुरुवातीची वाढ होण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक असते. यालाच पेरणीयोग्य ओलावा म्हणतात.
बहुतांश खरीप पिकांसाठी 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतर पेरणी करणे सुरक्षित मानले जाते. मात्र हा पाऊस जमिनीत ओलावा साठेल असा असावा.
शेतातील माती 20 ते 25 सेंमी खोलीपर्यंत घेऊन हातात दाबून पाहा. या साध्या चाचणीतून पेरणीची योग्य वेळ ओळखता येते.
मातीचा गोळा हातात दाबल्यावर तयार होत असेल आणि लगेच फुटत नसेल, तर जमिनीत पेरणीसाठी पुरेसा ओलावा आहे.
माती हाताला खूप चिकटत असेल तर जमीन अजून ओलसर आहे. अशावेळी वाफसा येईपर्यंत पेरणी टाळावी.
मातीचा गोळा तयार न होता लगेच तुटत असेल, तर ओलावा अपुरा आहे. अशा परिस्थितीत पेरणी केल्यास उगवण कमी होऊ शकते.
एल निनोच्या वर्षात पावसात खंड पडू शकतो. त्यामुळे पुढील 7 ते 10 दिवसांचा अंदाज पाहूनच पेरणी केल्यास दुबार पेरणीचा धोका कमी होतो.