Team Agrowon
उतिसंवर्धन तंत्रामध्ये वनस्पतीच्या जिवंत पेशी ठरावीक तापमान असलेल्या वृद्धी माध्यमात वाढविल्या जातात. पेशी, उती, इंद्रिये यांच्या संवर्धनासाठी घन, द्रव आणि अर्ध द्रव माध्यम वापरले जाते.
उती संवर्धनाचे विविध टप्पे आहेत. यामध्ये मातृवृक्षाची निवड आणि संगोपन केले जाते. त्यानंतर वनस्पतीच्या उतीचे निर्जंतुकीकरण आणि पोषक माध्यमावर रोपण केले जाते. हे कृत्रिम वातावरणात केले जाते.
ठरावीक दिवसाच्या अंतराने (२१ ते २८ दिवस) शाखीय फुटवे नव्याने तयार केलेल्या पोषक माध्यमात रोपण करून अधिकाधिक रोपे तयार केली जातात.
सर्व रोपांच्या मुळ्यांचा विकास केला जातो. प्रयोगशाळेत तयार केलेल्या रोपांचे प्रथम हरितगृहात आणि नंतर शेडनेटगृहात टप्याटप्प्याने अनुकूलन घडवून आणले जाते.
या तंत्रामध्ये एका पेशींपासून अनेक रोपांची निर्मिती करता येते.या तंत्रामुळे मजबूत, प्रतिरोधक रोपे तयार होत आहेत. या तंत्राद्वारे जरबेरा, स्ट्रॉबेरी, डाळिंब, केळी, पेरू, जांभूळ, बांबू, संत्रा, शेवंती, ऊस, बटाटा आदी पिकांच्या रोपांची निर्मिती होत आहे.
रोपे प्रयोगशाळेत तयार होत असल्यामुळे त्यांच्या उत्पादनांवर बाहेरील वातावरणाचा परिणाम होत नाही.
फळधारणा लवकर तसेच उत्कृष्ट प्रतीची असते. दुर्मीळ किंवा विशिष्ट गुणधर्मांचा जाती किंवा प्रगत जातींची कमी तापमानात उती संवर्धन पद्धतीने लागवड क्षमता टिकवून त्यांचे जतन करता येऊ शकते.