Anuradha Vipat
शेवग्याच्या शेंगांची आमटी ही चवीला जेवढी अप्रतिम लागते, तेवढीच ती आरोग्यासाठी एखाद्या औषधासारखी काम करते.
ही पारंपरिक महाराष्ट्रीयन आमटी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सांधेदुखी दूर ठेवण्यासाठी उत्तम मानली जाते.
शेवग्याच्या शेंगा,भिजवलेली तुरीची डाळ किंवा हरभरा डाळ,भाजलेले शेंगदाणे कूट,भाजलेले सुके खोबरे आणि कांदा पेस्ट,आले-लसूण पेस्ट,कांदा-लसूण मसाला , हळद, धने पूड, गरम मसाला, तेल, मोहरी, जिरे, चिमूटभर हिंग, कढीपत्त्याची पाने, मीठ, कोथिंबीर.
कुकरमध्ये किंवा कढईत थोडे पाणी, चिमूटभर हळद आणि मीठ घालून चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा ५ ते ७ मिनिटेउकळून घ्या. कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी द्या. त्यात आले-लसूण पेस्ट आणि कांदा-खोबऱ्याचे वाटण घालून तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्या.
गॅस मंद करा आणि हळद, कांदा-लसूण मसाला, धने पूड व गरम मसाला घालून १ मिनिट परता.
या मसाल्यामध्ये उकळलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि शेंगदाण्याचे कूट घाला. आवश्यकतेनुसार आणखी थोडे गरम पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून आमटी एकत्र करा.
आमटीला मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटे छान उकळी येऊ द्या, जेणेकरून मसाल्यांचा अर्क शेंगांमध्ये उतरेल. वरून ताजी कोथिंबीर भुरभुरा.