Mahesh Gaikwad
यंदाच्या द्राक्ष हंगामावर नैसर्गिक संकट ओढावले. त्यातूनही शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत राज्यातील ४३ हजार १५६ शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.
राज्यातून द्राक्ष निर्यातीस प्रारंभ झाला असून आजअखेर राज्यातून १७ हजार ४३३ टन द्राक्षे निर्यात झाली आहेत.
सद्यःस्थितीत निर्यात संथ गतीने सुरू असून फेब्रुवारीच्या मध्यापासून द्राक्ष निर्यातीला गती येईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली.
राज्यात द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासूनच संकटाची मालिका सुरू झाली. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला. परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकऱ्यांनी निर्यातक्षम बागा वाचवल्या.
यंदा राज्यातून ४३ हजार १५६ शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यात करण्यासाठी नोंदणी केली आहे.
राज्यातून बांगलादेश, आखाती देशात नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांपासून द्राक्षाची निर्यात सुरू होते. त्यानंतर जानेवारी महिन्यापासून युरोपियन देशात द्राक्ष निर्यात होण्यास प्रारंभ होतो.
यावर्षीही जानेवारी महिन्यापासून युरोपियन देशात द्राक्षाची निर्यात सुरू झाली आहे. राज्यातून द्राक्षाची १३०५ कंटनेरमधून १७ हजार ४३३ द्राक्षाची निर्यात झाली आहे.