Team Agrowon
दुधाचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांसह पशुधन असणारे अडचणीत आले आहेत. ज्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.
संपूर्ण राज्यात दुधाचे दर जवळजवळ आठ ते दहा रुपयांनी कमी झाले असून सध्या प्रतिलीटर २६ ते २८ रुपये दर दूध उत्पादक शेतकऱ्याला मिळत आहे.
त्यामुळे दूध ऊत्पादक शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय तोट्यात आला आहे. त्यामुळे यावर सरकारने ताबडतोब मार्ग काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.
मागील जून महिन्यात ३.८/८.५ फॅट व एसएनएफ प्रतीच्या दुधाला प्रतिलीटर ३४ रुपये हमीभाव देण्यासंबंधीचा शासन निर्णय झालेला होता. परंतु दूधसंघ मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांच्या दुधाला कमी दर देत संकलन करीत आहेत.
सध्या पशुखाद्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. तसेच भरडा, पशु औषधांच्या वाढलेल्या किमती व वैरणीच्या तुटवड्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
सरकारच्या या धोरणाविरोधात रयत क्रांती संघटनेने पुणे येथील प्रादेशिक दुग्ध विकास कार्यालयावर कावड मोर्चा काढला. हा मोर्चा सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.
यावेळी शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलीटर ३४ रू हमीभावासह ५ रुपये अनुदान मिळावे, अशी मागणी खोत यांनी कावड मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली आहे.