Team Agrowon
देशातील कापसाची उत्पादता वाढविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून सघन कापूस लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहे.
या प्रकल्पांतर्गत २०२४-२५ या वर्षातही याची अंमलबजावणी केली जाणार आहे. देशातील आठ राज्यांमध्ये सुमारे ३० हजार हेक्टरवर अतिसघन आणि लांब धाग्याच्या कापूस वाणांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
जगात भारतात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होते. भारतात सर्वाधिक १३० लाख हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते.
याच पार्श्वभूमीवर केंद्राकडून सघन, अतिसघन कापूस लागवड प्रकल्प राबविला जात आहे. २०२३-२४ या वर्षात पहिल्यांदा या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली.
जगाच्या पातळीवर भारतात लागवड क्षेत्र अधिक असूनही उत्पाकतेत भारत मागे असल्याने याची दखल घेत केंद्र सरकार हा प्रकल्प राबवत आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात याचे चांगले परिणाम दिसून आले असून पारंपरिक लागवडीच्या तुलनेत कापूस उत्पादकता २२ ते ५७ टक्क्यांपर्यंत वाढल्याची नोंद झाली आहे.
या वर्षी अति लांब धाग्याच्या कापूस वाणांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी प्रकल्पातील १० टक्के क्षेत्र राखीव राहणार आहे.