Swarali Pawar
दुष्काळात जमिनीतील ओलावा कमी होतो आणि तापमान वाढते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी पिकांसोबत जमिनीचीही काळजी घेणे गरजेचे आहे.
सुके गवत, पालापाचोळा आणि उसाचे पाचट जमिनीवर पसरवा. यामुळे जमिनीचे तापमान कमी राहते आणि ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
सूक्ष्मजीव अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करून देतात आणि मातीची रचना सुधारतात. ओलावा कमी झाल्यास त्यांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे जमिनीचे आच्छादन करणे महत्त्वाचे आहे.
सेंद्रिय कर्बामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि सुपीकता सुधारण्यास मदत होते. चांगले कुजलेले शेणखत आणि कंपोस्ट खत वापरून जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढवा.
तण पिकांसोबत जमिनीतील पाणी आणि अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा करतात. त्यामुळे वेळेवर तण नियंत्रण करून उपलब्ध ओलावा पिकांसाठी राखून ठेवा.
दुष्काळात वारंवार खोल नांगरणी केल्यास जमिनीतील ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे शक्य असेल तिथे शून्य किंवा किमान मशागतीचा अवलंब करा.
शेतातील परिस्थितीनुसार चांगले कुजलेले शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत आणि शिफारशीनुसार जैविक खते वापरा. यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आणि उपयुक्त सूक्ष्मजीवांचे कार्य सुधारण्यास मदत होते.
ओलाव्याअभावी पेरणी करता येत नसेल, तरी जमीन शक्यतो उघडी ठेवू नका. सेंद्रिय आच्छादनामुळे जमिनीचे उन्हापासून संरक्षण होते आणि पुढील हंगामासाठी तिचे आरोग्य जपण्यास मदत मिळते.