Team Agrowon
इस्राईलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे पाणी व्यवस्थापनासाठी जीएसआय प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
या यंत्रणेद्वारे स्मार्ट मोबाइलचा वापर करून पिकाला खत आणि पाणीपुरवठ्याचे नियोजन करता येते.
यामध्ये अत्याधुनिक कंट्रोलरमध्ये इंटरनेटचा वापर करून एका ग्लोबल सर्व्हरच्या माध्यमातून शेतामध्ये इंटरनेटवर चालणारा कंट्रोलर आणि शेतकऱ्याचा मोबाइल जोडला जातो.
शेतकऱ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार शेतात संचलित होणाऱ्या खत आणि पाणी व्यवस्थापनेची सर्व माहिती स्मार्ट फोन किंवा संगणकामध्ये आवश्यक वेळेत पाहता येते. त्यामध्ये गरज भासल्यास कुठूनही बदल करता येतो.
शेतातील पंप, विद्युत उपलब्धतेनुसार वेगवेगळ्या शेतामध्ये पुरवठा करण्यासाठी खत, पाणी यांची मात्रा आदी गोष्टींचे निरीक्षण व नियंत्रण मोबाइलद्वारे करता येते. या तंत्रज्ञानामुळे पिकाची पाणी आणि खताची गरज तंतोतंत पुरवली जाते.
सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ठिबक सिंचन प्रणालीचे नियंत्रण शेतकऱ्याला स्वतः करावे लागते. यामध्ये नियोजनाचा खूप अभाव असतो.
पिकाला लागणारे पाणी, खतांची गरज ही पीक वाढीची अवस्था आणि वातावरणातील तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, सूर्यप्रकाशाचा दिवसातील कालावधी या बाबींवर अवलंबून असतो.