Anuradha Vipat
दिवाळीच्या फराळात खुसखुशीत आणि जिभेवर रेंगाळणारी करंजी नसेल तर फराळ अपूर्ण वाटतो.
अचूक प्रमाणासह पारंपरिक पद्धतीने खुसखुशीत करंजी आणि त्याचे चवदार सारण कसे बनवायचे, याची सोपी रेसिपी खालीलप्रमाणे आहे.
मैदा, बारीक रवा,गरम तुपाचे मोहन,दूध किंवा पाणी,मीठ,सुकं खोबरं ,पिठीसाखर,बारीक रवा,खसखस,वेलची आणि जायफळ पूड,काजू, बदाम, पिस्ता, तूप किंवा तेल.
किसलेलं सुकं खोबरं मंद आचेवर हलकंसं सोनेरी होईपर्यंत कोरडंच भाजून घ्या. तूप टाकून रवा आणि खसखस छान खमंग भाजून घ्या. तसेच ड्रायफ्रूट्सचे तुकडेही हलके परतून घ्या. मोठ्या भांड्यात भाजलेले खोबरे, रवा, खसखस, ड्रायफ्रूट्स, पिठीसाखर आणि वेलची-जायफळ पूड एकत्र करा. तुमचे पारंपरिक सुके सारण तयार आहे.
मैदा, बारीक रवा आणि चिमूटभर मीठ एकत्र करा. ३ चमचे कडकडीत गरम तुपाचे मोहन टाका. तूप पिठाला हाताने व्यवस्थित चोळून घ्या. थोडे थोडे कोमट दूध किंवा पाणी वापरून पीठ घट्ट मळून घ्या. हे पीठ ओल्या कपड्याने झाकून किमान ३० मिनिटे बाजूला ठेवा.
मळलेले पीठ पुन्हा एकदा छान मळून घ्या आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करा.एक गोळा घेऊन त्याची पातळ पुरी लाटून घ्या. पुरी जास्त जाड नसावी. या पुरीच्या मध्यभागी १ ते २ चमचे तयार सारण भरा. पुरी दुमडून कडा हाताने नीट दाबून बंद करा.
तेल किंवा तूप मंद ते मध्यम आचेवर गरम करा. तेलात करंजी सोडल्यानंतर त्यावर झाऱ्याने हलके तेल उडवा, यामुळे करंजी छान फुगते. दोन्ही बाजूंनी हलका सोनेरी रंग येईपर्यंत करंजी मंद आचेवर तळून घ्या.