Team Agrowon
महाराष्ट्रामध्ये हरितगृहातील भाजीपाल्यामध्ये रंगीत ढोबळी मिरची घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही शेडनेटमध्ये ढोबळी मिरची अनेक ठिकाणी केली जाते.
हरितगृहामध्ये लाल, पिवळ्या आणि नेहमीच्या हिरव्या ढोबळी मिरच्यांची लागवड केली जाते.
आपले गाव शहराच्या जवळ असल्यास लाल आणि पिवळ्या रंगांच्या ढोबळी मिरचीला अधिक उठाव मिळू शकतो, कारण या मिरच्यांची चव काहीशी गोडसर असल्याने त्यांचा वापर आपल्याकडे भाजी म्हणून होत नाही.
पंचतारांकित हॉटेल आणि मोठ्या शहरांमध्ये मात्र रंगीत ढोबळी मिरच्यांची मागणी अधिक असल्याचे दिसून आले आहे, त्यासाठी अधिक दर उपलब्ध होतो. शहरामध्ये काढणीनंतर आपला माल पाठवणे सोईचे नसल्यास नेहमीच्या हिरव्या ढोबळी मिरचीचा पर्याय शेतकऱ्यांनी निवडावा.
दर्जेदार उत्पादनामुळे या मिरच्यांना स्थानिक बाजारपेठेत चांगला दर मिळू शकतो. आपल्या परिसरानुसार आणि बाजारपेठेतील स्वतःच्या अभ्यासानुसार मिरचीची जात निवडावी.
रंगीत ढोबळी मिरचीचा पर्याय निवडल्यास लाल व पिवळा या रंगांचे प्रमाण साधारणपणे - ६५ टक्के लाल आणि ३५ टक्के पिवळा असे ठेवावे.
रंगीत ढोबळी मिरचीच्या लागवडीसाठी गादीवाफ्याचा वापर करावा. गादीवाफा ९० x ४० x ५० सें.मी. आकाराचा असावा. या वाफ्यावर दोन ओळींत झिगझॅग पद्धतीने लागवड करावी.
रंगीत ढोबळी मिरचीचे पीक हे दहा महिन्यांचे आहे. काढणी करताना दूरच्या बाजारपेठेत पाठविताना मिरचीला पाच टक्के रंग आल्यानंतर काढणी करावी, तर जवळच्या बाजारपेठेसाठी रंग येण्याचे प्रमाण थोडे अधिक असले तरी चालू शकते.