Team Agrowon
सरकारकडून चिनी मालावर बंदी आणण्यात आली असली तरीही एपीएमसीत चिनी लसणाची आवक वाढल्याचे दिसते.
चिनी लसूण भारतीय बाजारात घुसखोरी करत असून आकाराने मोठा, सोलण्यास सोपा असल्याने बाजारात भाव खाऊन जात आहे.
चिनी लसणामुळे भारतीय देशी लसणाच्या किमतीवर परिणाम होत असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांची चिंता सध्या वाढली आहे.
चीनमधून भारतात मोठ्या प्रमाणात कृषिमालाची आयात होते. मात्र मागील काही काळापासून भारत आणि चीन या दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे भारताकडून चिनी मालावर ५-६ वर्षांपासून बंदी घालण्यात आली आहे.
असे असले तरी छुप्या मार्गाने भारतीय बाजारपेठेत चिनी माल येत आहे. नेपाळ, अफगाणिस्तान, तुर्कस्तानवरून बिहार आणि जम्मूमार्गे चिनी लसणाची तस्करी करून तो देशभरातील बाजारात आणला जात असल्याचे व्यापारी सांगतात.
चिनी लसणाच्या पाकळ्या हाताच्या अंगठ्या एवढ्या असतात; तर भारतीय लसूण आकाराने लहान असतो.
भारतातील हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडू भागात चिनी वाणाचा उटी प्रजातीचा लसूण पिकवला जातो. जो हुबेहूब चिनी लसणासारखा दिसतो. चिनी लसणावर प्रक्रिया केल्यामुळे तो पूर्णतः पांढरा दिसतो.
चिनी लसणाला ३५० रुपये प्रतिकिलो भाव मिळतो तर, देशी लसणाला किलोला ३०० रुपये भाव मिळतोय.