Team Agrowon
देशातील लाल मिरचीचे भाव मागील वर्षभरात कमी होत गेले. सध्या मिरचीला १२ हजार ते १४ हजारांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे.
जानेवारी २०२४ मधील दराच्या तुलनेत सध्या ३५ टक्के कमी भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
सरकारने मिरचीची २० हजार रुपये क्विंटलने खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
देशातील बाजारात मिरचीच्या भावात मागील वर्षात चांगली तेजी होती. २०२३ मध्ये मिरचीचा भाव २५ हजारांपर्यंत पोचला होता. त्यानंतर भाव कमी होत गेले. जानेवारी २०२४ मध्ये मिरचीचा भाव १९ हजारांवर पोचला होता.
बहुतांशी बाजारात मिरची १८ हजार ते २० हजाराने विकली जात होती. पण त्यानंतरही मिरचीचे भाव कमी होत गेले.
सध्या देशातील बहुतांशी बाजारात मिरची १२ हजार ते १४ हजारांच्या दरम्यान विकली जात आहे. मिरचीचे भाव पडल्याने शेतकरी मात्र अडचणीत आले आहेत.
देशातून होणारी लाल मिरचीची निर्यातही कमी झाली आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये ३६ हजार टनांची निर्यात झाली होती. आधीच्या महिन्यातील निर्यातीच्या तुलनेत ही निर्यात ४ टक्क्यांनी कमी होती.
तर एप्रिल ते ऑक्टोबर या काळात देशातून ३ लाख ३१ हजार टनांची निर्यात झाली. तर मागील हंगामात याच काळातील निर्यात ३ लाख टन होती. म्हणजेच लाल मिरचीची निर्यात वाढली होती. मात्र निर्यातीचे मूल्य कमी झाले.
मागच्या वर्षी निर्यात कमी असूनही त्यातून ७ हजार ५७४ कोटी डाॅलर मिळाले होते. मात्र यंदाच्या आर्थिक वर्षात पहिल्या ७ महिन्यांमध्ये निर्यातीचे मूल्य १५ टक्क्यांनी कमी होऊन ६ हजार ४५१ कोटी डाॅलरपर्यंत कमी झाले होते. म्हणजेच भाव कमी झाल्याने निर्यात वाढूनही निर्यातमूल्य कमीच राहीले.