Team Agrowon
मानवी आहारात चिया सीड चे महत्व पाहता बरेच शेतकरी चिया सीड ची लागवड करतात. रब्बी हंगामात चिया सिडची लागवड मोठ्या प्रमाणात होते. पण चिया सीडची विक्री मात्र परराज्यात जाऊन करावी लागत होती.
राज्यात वाशीम जिल्हा चियासीड लागवडीमध्ये अग्रेसर होत आहे. या हंगामात साडेतीन हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रांवर लागवड झाली आहे. आता चियासीड काढणीला सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवस हा हंगाम चालणार आहे.
चियासीडची खरेदी महाराष्ट्रात केली जात नव्हती. निमज (मध्य प्रदेश) येथेच चियासीडची बाजारपेठ आहे. पण आता लागवडीचे क्षेत्र वाढल्यामुळे वाशीम बाजार समितीने पणन विभागाची परवानगी घेत वाशीम बाजार समितीत चिया खरेदीला सुरुवात केली आहे.
मागील दोन वर्षांत वाशीम जिल्ह्यातील चियासीडची शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत खरेदी झाली होती. प्रामुख्याने रसायनमुक्त पद्धतीने पिकवलेला चिया खरेदीचा करारही झालेला आहे. यंदाही त्याच पद्धतीने खरेदी केली जात आहे.
पण इतर शेतकऱ्यांचा चियासीड विकण्यासाठी सुविधा म्हणून बाजार समितीत व्यवहार सुरू करण्यात आले आहेत.
११ फेब्रुवारीला चियासीड खरेदीच्या सुरुवातीला उच्चांकी क्विंटलला २३ हजार रुपयांचा दर देण्यात आला. बाजारात पहिल्या दिवशी २५ क्विंटलपर्यंत चियाची आवक झाली होती.
यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा वेळ, वाहतुकीचा खर्च वाचला आहे आणि शेतकऱ्यांना बाहेरराज्यात जाण्याची गरजही भासणार नाही.