Swarali Pawar
हवामानातील बदलामुळे पारंपरिक पिकांचे नुकसान होत असताना कमी पाण्यात येणाऱ्या पर्यायी पिकांचा विचार करता येतो. चिया सीड कमी खर्चात आणि तुलनेने कमी पाण्यात घेता येणारे पीक म्हणून शेतकऱ्यांसमोर पर्याय ठरू शकते.
चिया हे मूळ मेक्सिकोतील तेलबिया पीक असून भारतातही त्याची लागवड वाढत आहे. या पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असल्याने उत्पादन खर्च कमी ठेवता येतो.
चिया पिकाच्या पानांमध्ये असलेले नैसर्गिक तेल आणि विशिष्ट वासामुळे वन्यजीव या पिकापासून दूर राहतात. त्यामुळे वन्यजीवांचा त्रास असलेल्या शेतांमध्ये चिया हा पर्यायी पीक म्हणून विचारात घेता येतो.
चिया पिकासाठी हलकी ते मध्यम आणि उत्तम निचरा होणारी जमीन योग्य ठरते. पेरणीनंतर साधारण ३ ते ४ महिन्यांत पीक काढणीसाठी तयार होते.
चिया पिकाच्या पेरणीसाठी साधारण ५ ते २५ ऑक्टोबर हा कालावधी योग्य मानला जातो. उगवणीसाठी २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान पोषक ठरते.
चिया पीक वाढताना तणांशी स्पर्धा करू शकते, तरी सुरुवातीच्या काळात तण नियंत्रण महत्त्वाचे आहे. वेळेवर आंतरमशागत केल्यास पिकाची वाढ चांगली होण्यास मदत होते.
चिया हे तुलनेने काटक पीक असून बदलत्या तापमानातही वाढू शकते. मात्र आपल्या भागातील हवामान, पाण्याची उपलब्धता आणि पिकाची योग्य अवस्था लक्षात घेऊन लागवड करणे महत्त्वाचे आहे.
एल निनो, ला निना आणि हवामान बदलाच्या परिस्थितीत कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचा पर्याय शेतकरी विचारात घेऊ शकतात. मात्र लागवडीपूर्वी स्थानिक बाजारपेठेतील मागणी, हमीभाव किंवा विक्रीची उपलब्धता आणि उत्पादन खर्चाचा अंदाज नक्की घ्या.