Team Agrowon
सध्या कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी ही ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत, तर बागायती हरभऱ्याची पेरणी ही १० नोव्हेंबरपर्यंत करता येईल. हरभऱ्याची पेरणी रुंद वरंबा सरी पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरते.
बीबीएफ यंत्राने हरभऱ्याची पेरणी केल्यास चांगली मशागत होऊन बियाण्यासाठी चांगले वरंबे म्हणजेच सीडबेड तयार होतात.
रुंद वरंब्यावर पीक असल्याने पिकात हवा खेळती राहण्यास मदत होते आणि पिकाल नेमकं पाणी मिळत राहतं. तर दोन्ही बाजूंनी असलेल्या सरींमुळे जास्तीच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होते. यामुळे पाणी आणि हवा यांच योग्य संतुलन राखलं जाऊन पिकाची जोमदार वाढ होते.
बीबीएफ यंत्राने एकाच वेळी आवश्यक रुंदीचे वरंबे, दोन्ही बाजूंनी सऱ्यांसह तयार होतात. त्यात बियाणे पेरणी आणि खते देण्याचं कामही त्याच वेळी होत. त्यामुळे वेळ, मजुरी, खर्च, इंधन या सर्वांमध्ये बचत होते.
रुंद वरंबा सरी यंत्राच्या साहाय्याने पिकानुसार ६० ते १५० सेंटीमीटर रुंदीचे वरंबे तयार करता येतात.ओळीमध्ये जास्त अंतर असलेल्या पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या तीन ते चार ओळी रुंद वरंब्यावर घेता येतात.
हरभरा पिकाच्या एका रुंद वरंब्यावर तीन ते चार ओळी गरजेनूसार आंतर ठेवून पेरता येतात. यासाठी दोन ओळींतील अंतर गरजेनुसार ३० सेंटीमीटर किंवा ४५ सेंटीमीटर किंवा कमी जास्त करावे.
रुंद वरंब्यावर टोकण यंत्राच्या साह्याने बियाणे व खते पेरता येतात. याशिवाय पिकांच्या दोन ओळी आणि दोन रोपांमधील अंतर शिफारशीनुसार कमी जास्त करता येते. त्यामुळे हेक्टरी आवश्यक एवढी रोपांची संख्या ठेवता येते.