Team Agrowon
बांबू हे राज्यातल्या वेगवेगळ्या हवामानात येणारे आणि अनेक वर्षे आपल्या शेतात राहणारे पीक आहे. त्यामुळे लागवड करताना योग्य काळजी घ्यावी. लागवडीपूर्वी किमान दोन ते तीन ठिकाणी केलेली बांबू लागवड पहावी.
आपण बांबू लागवडीखाली किमान ३० वर्षे जमीन गुंतवून ठेवणार आहोत, हे लक्षात घेऊन नियोजन करावे. पूर्ण अभ्यास करून बांबू लागवडीकडे वळावे.
आपण लागवड कशासाठी करत आहोत हे निश्चित करावे. व्यापारी पद्धतीने लागवड, वारघडीसाठी, जमिनीची धूप थांबवण्यासाठी किंवा पाणी समृद्धीसाठी बांबू लागवड करता येते. या प्रत्येक गोष्टीसाठी लागवड करण्याच्या जाती व पद्धती वेगळ्या आहेत.
हवामान आणि जमिनीच्या प्रकारानुसार जाती आणि लागवडीची पद्धत बदलते.
व्यापारी लागवड करताना बांबूची विक्री कोठे करणार? हा बांबू कोण घेणार? याचा अभ्यास करावा.थोड्याशा चुकीने आपला पैसे, वेळ आणि मेहनत वाया जाऊ देऊ नका.
थोडी उतारावरील, वरकस किंवा मुरुमाड जमीन लागवडीसाठी सर्वांत चांगली असते. काळी जमीन ही जरी चांगली असली तरी इतर भुसार पिके घेणे शक्य नसेल तरच लागवड करावी.
बांबूला साठलेले पाणी चालत नाही. पाण्याचा निचरा झाला पाहिजे. त्यामुळे बांबू लागवडीसाठी जमिनीची निवड हा अत्यंत महत्वाचा घटक आहे.