Team Agrowon
आदिवासी विकास महामंडळाच्या मनोर आणि कासा उपप्रादेशिक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील चार भात खरेदी केंद्रांमधून सोमवार (ता. १२) पासून भात खरेदीला सुरुवात झाली.
खासदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत घोळ आणि निहे केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
डिसेंबर उजाडला तरीही खरीप हंगामात पिकवलेल्या भाताची खरेदी सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता.
अखेर भात खरेदीसाठी महामंडळाकडून १९ हजार ५०० बारदाने उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
पीकपाहणी अॅपमध्ये खरीप हंगामातील लागवडीची नोंदी करताना निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर नोंद नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आदिवासी विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करता आली नाही.
शेतकऱ्यांना नोंदणीसाठी अडचणी येत असल्याने महामंडळाकडे नोंदणीसाठी तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती.