Team Agrowon
खानदेशात आगाप मृग बहर केळी लागवड सुरू झाली आहे. यंदा लागवड स्थिर राहील.
उष्णतेसह नैसर्गिक समस्यांना तोंड देवून शेतकरी ही लागवड यशस्वी करण्याची धडपड करीत आहेत.
यंदा खानदेशात सुमारे ३५ ते ३७ हजार हेक्टरवर मृग बहरातील केळी बागांची लागवड होईल. ही लागवड मे अखेरीस किंवा जूनच्या मध्यात सुरू होते.
बाजारातील दर, पाण्याची उपलब्धता व अन्य बाबी लक्षात घेऊन शेतकरी आगाप लागवडी करीत आहेत. परंतु खानदेशातील तापमान सध्या ४३ अंश सेल्सिअसवर आहे.
अति उष्णता असतानाही शेतकरी ही लागवड करीत आहेत. लागवडीसाठी केळी रोपे व कंदांचाही उपयोग केला जात आहे. रोपांना क्रॉप कव्हर लावले जात आहे.
तर कमाल शेतकऱ्यांनी प्रत्येक रोपाच्या पश्चिम व दक्षिण बाजूला ताग, धैंचाची लागवड केली असून, उष्णतेपासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे.
वादळ, गारपिटीची समस्या खानदेशात सुरूच आहे. अशात रोहित्रांतील बिघाड, वीज बंद होणे आदी समस्याही तयार होत असून, यावर ट्रॅक्टरचलित जनित्राचा पर्यायही शेतकऱ्यांनी शोधला आहे.