Team Agrowon
चवळी चारा पिकाच्या सुधारित वाणांमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील अखिल भारतीय चारा पिके संशोधन प्रकल्पाने ‘श्वेता’ या वाणाची शिफारस राज्यस्तरावर केलेली आहे.
श्वेता या सुधारित वाणास भरपूर हिरवी रूंद पाने असून पानांची हिरव्या चाऱ्याची प्रत फूलधारणेपासून शेंगा पक्व होईपर्यंत टिकून राहते. श्वेता या वाणापासून उत्तम प्रतिचा हिरवा चारा मिळवता येतो.
पेरणीकरिता हेक्टरी ४० - ४५ किलो भेसळ विरहीत न फुटलेले, टपोरे व शुध्द बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम ‘रायझोबियम’ चोळावे.
बियाणे पेरणीपूर्वी हेक्टरी २० किलो नत्र म्हणजेच ४३ किलो युरिया व ४० किलो स्फुरद म्हणजेच २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण करून द्यावे.
पेरणीनंतर लगेच एक पाणी द्यावे. त्यानंतर ४ ते ५ दिवसांनी दुसरे आंबवणीचे पाणी दयावे. उन्हाळी हंगामात ७ ते ९ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
पिकांच्या दोन ओळींमधील जमीन हातकोळप्याने कोळपून घ्यावी. बियाणे पेरणीनंतर २१ - २५ दिवसांनी एक खुरपणी करून पीक तणविरहीत ठेवाव. चवळीचे वेल उंच व दाट वाढत असल्याने पीक वाढीच्या काळात जमीन झाकली जाऊन तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
चवळी पिकाची कापणी पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी पीक ५० टक्के फुलोऱ्यात असतांना केल्यास सकस हिरव्या चाऱ्याचे भरपूर उत्पादन मिळतं.
सर्वसाधारणपणे हिरव्या चाऱ्याचे उत्पादन प्रति हेक्टरी २५० ते ३२० क्विंटल मिळते.