Solapur Hurda Brand : सोलापुरी हुरड्याला ‘कार्पोरेट लूक’

Hurda Party : हुरडा पार्टींना आता व्यावसायिक, ‘कार्पोरेट लूक’ प्राप्त झाला आहे. त्यातून अर्थकारण उंचावून उलाढालही वाढली आहे. शेतकऱ्यांना उत्पन्नाचे हुकमी साधनही प्राप्त झाले आहे.
Hurda Party
Solapur Hurda Brand Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : ज्वारीचे कोठार अशी सोलापूर जिल्ह्याची ओळख अगदी पुरातन काळापासून आहे. ज्वारीच्या या पट्ट्यात प्रामुख्याने रब्बी हंगामामध्येच ज्वारीची पेरणी होते. जिल्ह्याचे या पिकाखालील सरासरी क्षेत्र सव्वातीन लाख हेक्टरच्या आसपास आहे.

जिल्ह्यात बहुतेक सर्व भागात ज्वारी घेतली जातेच, पण मंगळवेढा हा सर्वांत आघाडीचा तालुका असून मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी या तालुक्यांमध्येही त्याचे क्षेत्र लक्षणीय आहे.

सरासरीच्या क्षेत्राच्या तुलनेत एकूण क्षेत्रापैकी दरवर्षी किमान अडीच लाख हेक्टरवर पेरा होतो. पांढरी शुभ्र, मोत्यासारखे दाणे आणि त्याला मिळणारी विशिष्ट चव- गोडी अशी वैशिष्ट्ये असलेली ही ज्वारी म्हणजे सोलापूरच्या मातीचा गुण म्हटला पाहिजे. कोवळ्या हुरड्यामध्ये ही सारी वैशिष्ट्ये उतरलेली अनुभवायला मिळतात.

हुरडा पार्टीची रंगत

साधारण डिसेंबरपासून सोलापूर जिल्ह्यात हुरडा पार्ट्यांचा हंगाम वेग घेऊ लागतो. ज्वारीच्या हिरव्यागार कणसांनी डोलणारी शिवारे, हुरड्यासाठी पेटविलेल्या आगट्या, त्यात भाजली जाणारी कोवळी कणसं, गरमागरम झाल्यानंतर हातावर चोळून तयार झालेला लुसलुशीत हुरडा. जोडीला शेंगदाणा चटणी, फरसाण, गूळ, गोडी शेव, लसूण- तिळाची चटणी, रेवडी, वांग्याची भाजी, शेतातील गाजर, पेरू, बोर आदी गावरान मेवा...अशा या हुरडा पार्टीची रंगत काही औरच असते. त्यातून फळांनाही चांगला उठाव मिळतो.

Hurda Party
Jowar Hurda Benefits : खमंग, चवदार आरोग्यासाठी फायदेशीर ज्वारीचा हुरडा

हुरड्याचे खास वाण

जिल्ह्यात ज्वारीच्या मालदांडीसह अन्य वाणांचीही पेरणी केली जाते. मात्र खास हुरड्यासाठी म्हणून ज्वारीचे काही वाण प्रसिद्ध आहेत. अनेक शेतकरी तसेच कृषी पर्यटन केंद्र व्यावसायिक त्यांची आवर्जून निवड करतात. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने (राहुरी) विकसित केलेल्या फुले मधुरा आणि पारंपरिक सुरती वाणाला सर्वाधिक पसंती आहे.

गूळभेंडी, कुचकुची हे पारंपरिक वाणही मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. त्याद्वारे तीन ते साडेतीन महिन्यांमध्ये खात्रीशीर उत्पन्न मिळविण्याची संधी असते. एकावेळी सरसकट क्षेत्रावर पेरणी न करता टप्प्याटप्प्याने १० ते १५ दिवसांच्या काळाने प्रत्येकी दहा- दहा गुंठ्यांत पेरणी केल्याने नोव्हेंबर-डिसेंबरपासून ते फेब्रुवारी-मार्चपर्यंत हुरडा उपलब्ध होत राहतो.

देवस्थानांमुळे कृषी पर्यटनाला वाव

अनेक शेतकरी स्वतः हुरडा पार्टी आयोजित करतात. काही जण आपल्याकडील हुरडा कृषी पर्यटन केंद्र व्यावसायिकांना पुरवतात. काही जण रस्त्याच्या कडेला स्टॉल उभारूनही हुरड्याची विक्री करतात. या कणसांना प्रति किलो १८०, २०० ते २५० रुपये तर अनेकवेळा ४०० रुपयांपर्यंतही दर मिळतो.

सोलापुरातील प्रसिद्ध श्री. सिद्धेश्वर मंदिर, पंढरपुरातील श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, अक्कलकोटचे श्री. स्वामी समर्थ मंदिर, शेजारील तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर, गाणगापूरचे श्री. दत्त मंदिर अशी सोलापूरच्या चहूबाजूला शंभर किलोमीटरच्या आत विविध देवस्थाने आहेत. त्यामुळे कृषी पर्यटनासाठीही इथे संधी निर्माण झाल्या आहेत. अलीकडे त्या दृष्टीने काही कृषी पर्यटन केंद्रे प्रयत्नशील झाली आहेत.

कृषी पर्यटन केंद्रे होताहेत ‘डेस्टिनेशन’

जिल्ह्यात आजघडीला २० हून अधिक कृषी पर्यटन केंद्रे केवळ हुरडा आणि अस्सल गावरान भोजनासाठी ओळखली जाते. येथे कायम आगाऊ बुकिंग होत असते. सोलापूरच नव्हे तर मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी शहरांमधून येथे ग्राहकांची गर्दी असते. मित्रमंडळी, कुटुंबे, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही स्थळे खास ‘डेस्टिनेशन’ झाली आहेत.

Hurda Party
Hurda Party : जिरायती भागातील गोविंदबनात बहरली हुरडा पार्टी

आश्‍वासक उलाढाल

तीन ते चार महिन्यांच्या या हुरडा ज्वारी हंगामात शेतकरी एकरी दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवून जातात. कणसांना २०० ते २५० रुपये प्रति किलो दर मिळतो. कृषी पर्यटन केंद्रांमध्ये प्रति व्यक्ति ५०० ते ७५० रुपयांपर्यंत ‘पॅकेज’ स्वरूपात शुल्क असते. या व्यवसायातून हजारो हातांना रोजगार मिळतो शिवाय ५० ते ६० कोटी रुपयांची उलाढाल होते.

कृषी पर्यटनातील वैशिष्ट्यपूर्ण ‘चिंचणी’

पंढरपूर तालुक्यातील चिंचणी हे कृषी पर्यटनातील वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे. मोहन अनपट यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गावच या व्यवसायात उतरले आहे. जेमतेम ६५ कुटुंबे असलेल्या या गावात सर्व जण पर्यटकांच्या आदरतिथ्यासह सर्व कामात गुंतलेले असतात. हुरडा, भोजन आणि अस्सल ग्रामीण भागाची सैर पर्यटकांना इथे घडवून आणली जाते. तीन वर्षांत या गावाने ८० लाख रुपयांचा व्यवसाय उभारला आहे.

कार्पोरेट हुरडा पार्टी

या हुरडा पार्टी आता कार्पोरेट स्तरावरही पोहोचल्या आहेत. सोलापूर येथील ड्रीम फाउंडेशनचे प्रमुख काशिनाथ भतगुणकी यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अलीकडेच विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला झाले.

राज्याचे कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकारातून या अधिवेशनादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, अधिकारी यांच्यासाठी खास सोलापुरी हुरड्याचा बेत आखण्यात आला होता.

त्या वेळी या हुरड्याने सर्वांनाच भुरळ पाडली. मागील वर्षी मुंबई, दिल्लीतही अशा पार्टी आयोजित करण्यात आल्या होत्या. नव्यानेच उभारलेल्या कामती खुर्द येथील ‘सीनाई ॲग्रो टुरिझम’चे लहू आवताडे यांनीही कृषी पर्यटन केंद्रांचे वेगळे मॉडेल उभारले आहे. हुरडा, गावरान भोजनासह साहसी खेळांचे साहित्य त्यांच्याकडे आहे. त्याला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

सुमारे दहा वर्षांपासून हुरडा व्यवसायात आहोत. शेतकरी ते ग्राहक अशा थेट विक्रीवर भर आहे. कार्पोरेट हुरडा पार्टीसोबत सोलापूर परिसरात हुरडा महोत्सवही आयोजित करतो.
काशिनाथ भतगुणकी, हुरडा उत्पादक, संस्थापक, ड्रीम फाउंडेशन, सोलापूर ९८३४३०६३३७
शासनाने कृषी पर्यटन व्यवसायातील धोरणांमध्ये प्रोत्साहनात्मक बदल केले आहेत. त्यास व्यापकस्तरावर अजून चालना मिळायला हवी. आमच्या जिल्ह्यात आध्यात्मिक पर्यटनासोबत कृषी पर्यटनालाही मोठी संधी आहे.
-लहू आवताडे, प्रमुख, सीनाई ॲग्रो टुरिझम, कामती खुर्द, ता. मोहोळ ७७२००३३००४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com